+918048033429
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
गोष्ट पृथ्वीमोलाची.....1 You Tube वर मानसिक आरोग्याबद्दल भाष्य करणारी सुरेख वेबसिरीज चालू आहे. त्यातला हा एक एपिसोड. नवरा - बायकोचं नातं... अगदी तुटू आलेलं ...खूप मोठ्ठी भांडंणं आहेत अशातला भाग नाही पण छोटे-छोटे अनेक गैरसमज ... त्यातून उद्भवलेल्या तक्रारी....नातं तुटतंय की काय ही भीती... त्या भीतीपोटी उचलली गेलेली काही अतातायी पावलं...या सगळ्याचा परिपाक म्हणून खरंतर एकमेकांत गुंतलेलं पण वेगळं होण्याच्या वळणावर आलेलं हे जोडपं.... त्यांचा समुपदेशकाशी होणारा संवाद ...त्यातून आपल्याला दोघांची आपली-आपली कारणं समजतात... तक्रारी समजतात... खरंतर परस्परांबद्दल असलेली ओढ... त्यामुळे निर्माण झालेल्या अपेक्षा...अपेक्षाभंगामुळे निर्माण झालेल्या तीव्र भावना स्पष्ट होतात. जाहिरातीच्या शूटिंगच्या वेळी त्यांचा परस्परांशी होणारा संवाद त्यांचं अंतर्मुख होणं दाखवणारा... परस्परांशी असणारं अत्यंत जवळचं नातं..... त्यातला गुंता सोडवायचा की नातं सोडायचं या वळणावर अत्यंत समंजसपणे विचार कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण समोर ठेवून एपिसोड संपतो. साधारण अशाच वळणावर Counselling साठी जेव्हा जोडपी येतात तेव्हाचं असणारं नेहमीचं निरीक्षण आहे .... त्यांनी परस्परांना आहे तसं स्वीकारलेलं नसतं... स्वीकारण्यापूर्वीच परस्परांकडून आपल्या अपेक्षेप्रमाणे वागावं अशी अपेक्षा असते. ज्यांना आयुर्वेदाची भाषा परिचीत असते, त्यांना मी वात-पित्त-कफांच्या भाषेत समजावून सांगते. वातप्रधान प्रकृती असलेल्या एखाद्याला त्वचा कोरडी पडते म्हणून वर्षभर तेल, कोल्ड क्रीम लावावं लागतं तर कफप्रधान प्रकृतीच्या माणसाची त्वचा हिवाळ्यातही फारशी कोरडी पडत नाही....एखाद्याला हिवाळ्यातही पंखा हवा असतो तर एखाद्याला उन्हाळ्यातही पांघरूण लागते हे आपण किती सहजपणे स्वीकारतो. इतक्या सहजपणे स्वभावाचे कंगोरे, वागण्या-बोलण्याच्या सवयी स्वीकारतो का... कफप्रधान प्रकृतीची व्यक्ती असेल तर ती व्यक्त होण्यासाठी वेळ घेते. म्हणजे नवरा/बायको यांची कफप्रधान प्रकृती असेल तर छोट्या छोट्या प्रत्येक कृतीतून प्रेम व्यक्त करणे त्यांना जमत नाही. म्हणजे छोटी- मोठी गिफ्टस् आणणं, सरप्राइज देणं घडतंच असं नाही. याचा अर्थ जिव्हाळा नसतो असं नाही... उलटपक्षी जिव्हाळा पक्का असतो मात्र त्याची जाणीव करून देणं हा यांच्या स्वभावाचा भाग नसतो. कफप्रधान प्रकृतीचे लोक विचारी असतात. हे लोक कमी बोलतात, फार मोजक्या लोकांना जवळ करतात. Introvert म्हणता येतील असे असतात.कधीकधी हे लोक संवेदनाहीन आहेत की काय असे वाटते. हे लोक संवेदनशील असतात मात्र भावनेच्या भरात वाहून जाण्यापेक्षा हे लोक बुद्धीपूर्वक विचार करण्याला प्राधान्य देतात. पटकन कुणाला पुढे होऊन मदत करतील असे नाही पण मदतीचा हात पुढे करतात तेव्हा किती दिलं, त्याचा हिशोब ठेवत नाहीत. नवरा बायकोच्या नात्यापुरतं बोलायचं झालं तर सारखी छोटी गिफ्टस् मिळत नाही एकदमच Cheque book, debit-credit card मिळतं. आजूबाजूला त्रासदायक गोष्टी घडत असतानाही हे लोक स्वत:ला स्थिर ठेवू शकतात. अगदी बालपणीसुद्धा कफाची मुलं फारशी रडत नाहीत. सहनशीलता यांच्यात भरपूर असते. पित्तप्रधान असणारे लोक बुद्धी व स्वभाव तीक्ष्ण असणारे असतात. पटकन चिडतात तसे पटकन निवळतातदेखील. मदतीला एकदम वाघ असतात. आपला- परका असा भेद न करता झोकून देऊन मदत करतात. बाहेरून दिसताना हे लोक संतापी वाटतात मात्र ते अधिक संवेदनशील असतात. आपलं माणूस जवळ असेल तर स्वभावाची तीक्ष्णता बाजूला पडून डोळ्यात पाणी येणं हे या लोकांच्या बाबतीत स्वाभाविकपणे घडतं. इतरांचं दु:ख बघून ही माणसं पटकन विरघळतात. हे लोक क्लेश फारसे सहन करू शकत नाहीत. सर्वच गोष्टींवर हे लोक पटकन व्यक्त होतात. खरं तर यांना व्यक्त होणं आवडतं आणि जमतंही उत्तम. जोडीदाराच्या छोट्याशा गरजेसाठीही हे लोक जीवाचं रान करतात, प्रचंड जीव लावतात. टोकाचं प्रेम अथवा टोकाचा द्वेष हा यांचा नैसर्गिक स्वभाव....या दोन टोकांच्या मधल्या अंतरात थांबायला यांना प्रयत्न करावे लागतात. वातप्रधान लोकांचीदेखील मानसिक-भावनिक अस्थैर्य ही स्वाभाविक गोष्ट असते. हे लोक पुष्कळ मित्रमंडळीत रमतात, गप्पा-टप्पा, हास्यविनोद, कळलावेपणा या लोकांना प्रिय असतो. भरपूर मित्रमंडळी असली तरी या लोकांचे मैत्रीतलं स्थैर्यही फार काळ टिकत नाहीत. या लोकांच्या आपलेपणा- परकेपणा यासारख्या भावना पटकन निर्माण होतात आणि विरुनपण जातात. प्राय: वातप्रधान लोक भित्रे, थोड्या दुबळ्या मानसिक स्थितीचे असतात. हे ढोबळमानाने ३ प्रकार आहेत. यातलं कुणीच वाईट नाही... वाताच्या माणसांनाही नाती हवीच असतात फक्त ती राखता येतातच असं नाही. पित्त आणि कफाच्या माणसांची नाती टिकवण्याची आपापली पद्धत असते. माणसा-माणसात वात-पित्त-कफांची असंख्य combinations असतात. त्यानुसार स्वभावाच्या अगणित शेड्स दिसतात. त्यामुळे वादविवाद-दोषारोप करण्यापूर्वी आपलं माणूस जसं आहे तसं आपण स्वीकारलं तर त्याच्यात काही प्रमाणात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करता येतात. नात्यात तणाव असताना आणिक एक गोष्ट घडते - परत परत जुन्या गोष्टी उगाळल्या गेल्याने भावनांची तीव्रता, नकारात्मकता कायम राहते. शक्यतो जुन्या गोष्टी वारंवार उगाळू नयेत. दुख-या आठवणींमुळे भावनांची तीव्रता कायम राहत असेल तर त्यांना वाट करून द्यावी.. भावनांची तीव्रता कमी होऊ द्यावी. जर आपला स्वभाव जुने आठवण्याचा, उगाळण्याचा असेल तर त्यामुळे दर वेळी भावनिक कल्लोळ उसळू न देता वेगळ्या दृष्टीने त्याकडे बघण्याचा प्रयत्न करावा. समोरच्या माणसाचीही आपली म्हणून काही बाजू, काही विचार, कारणं असतातच की! ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित समोरच्या व्यक्तीचे, घडलेल्या घटनेचे काही नवे पैलू उलगडतील किंवा कदाचित स्वत:च्या स्वभावातले काही अंशही नव्याने कळतील.